छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा: वारसा शिवरायांचा विचार कर्मवीरांचा……
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा: वारसा शिवरायांचा विचार कर्मवीरांचा……
आधुनिक महाराष्ट्राच्या गौरवशाली जडणघडणीच्या परंपरेत अनेक संस्था व व्यक्ती यांनी आपापल्या परीने सर्वतोपरी योगदान दिलेले आहे.सुधारणावादी, पुरोगामी, महाराष्ट्राच्या या जडणघडणीच्या परंपरेत ‘रयत शिक्षण संस्था’ आणि रयत संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागतो.महाराष्ट्रातील अठरा पगड जातीतील, गोर गरिबांच्या मुलांनी शिकावे, त्यांचा संसार सुखाचा व्हावा याकरिता अहोरात्र कष्ट करून, महाराष्ट्रभर अनवाणी फिरून सर्वसामान्यांच्या, उपेक्षित, बहुजनांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी शिक्षण भगीरथ, थोर महात्मा, शिक्षणाचा किमयागार दिव्यमूर्ती, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सन १९१९ मध्ये ‘रयत शिक्षण संस्थेची’ स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सन १९४७ मध्ये स्थापन केलेले छत्रपती शिवाजी कॉलेज हे संस्थेचे पहिले महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाला खूप मोठे शैक्षणिक व ऐतिहासिक परंपरा आहे. या महाविद्यालयाने सन २०२२ मध्ये आपल्या स्थापनेचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले. कॉलेजच्या स्थापनेपासून ते आजअखेरच्या प्रदीर्घ अशा अमृत महोत्सवी वाटचालीचा साक्षेपाने घेतलेला आढावा सार रूपाने आपणासमोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न……
छत्रपती शिवाजी कॉलेजची सुरुवातच ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या ध्येयाने ‘श्रमाच्या मोबदल्यात शिक्षण’ हे सूत्र घेऊन ‘कमवा व शिका’ या योजनेद्वारे भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १५ जून १९४७ रोजी झाली. या महाविद्यालयाने गेल्या ७५ वर्षात महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक विकासात अत्यंत उल्लेखनीय कार्य केलेले आहे.
छत्रपती शिवाजी कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीचे सिंहावलोकन केले असता दृष्टोत्पत्तीस येते की, कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानानुसार हे कॉलेज शिक्षण फी विरहित व वसतिगृहयुक्त म्हणजेच ‘फ्री अॅण्ड रेसीडेन्सीअल’ अर्थात ‘मोफत व निवासी’ या तत्त्वानुरूप १९ विद्यार्थी संख्येवर १९४७ मध्ये सुरु झाले. १९५१ पासून बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु झाले. सन १९५४ पासून इंग्रजी, मराठी, इतिहास, अर्थशास्त्र या विषयांचे बी. ए. स्पेशलचे वर्ग सुरु करण्यात आले. याच कॉलेजमध्ये शिकत असलेल्या २७ विद्यार्थ्यांनी ऑगस्ट १९५५ मध्ये ‘गोवा मुक्ती आंदोलनात’ सक्रीय सहभाग घेतला. सन १९५८ पासून बी. ए. बरोबर प्री. डिग्री सायन्सचा तर १९५९ पासून प्री. डिग्री कॉमर्सचा वर्ग सुरु करण्यात आला. पुढे सन १९६१ मध्ये तृतीय वर्ष बी. एस्सी. तर १९६२ मध्ये तृतीय वर्ष बी. कॉम. सुरु करण्यात आले. दरम्यान १९६० मध्ये कॉलेजच्या २५ विद्यार्थ्यांनी श्री.माधवराव बागल यांच्या अध्यक्षतेखाली किमान १२ वर्षे संस्थेसाठी कार्य करण्याची शपथ घेतली. सन १९६५ मध्ये महाविद्यालयातील सायन्स विभाग स्वतंत्र झाला व पुढे १९८६ मध्ये त्याचे ‘यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ असे नामकरण करण्यात आले. सन १९७१ मध्ये महाविद्यालयातील कॉमर्स विभागही स्वतंत्र होऊन त्याचे ‘धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स’ असे नामकरण करण्यात आले. सन १९७५ पासून महाविद्यालयात ज्युनिअर कॉलेजचे वर्गही भरविण्यास सुरुवात झाली. सन १९९० पासून महाविद्यालयात किमान कौशल्याधारित पिकशास्त्र, फलोद्यानशास्त्र आणि प्रवास व पर्यटन तंत्र हे तीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. सन १९९५-९६ पासून महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले, जे या महाविद्यालयाची विशेष ओळख आहे. सन १९९६ पासून ‘कॉमनवेल्थ लिटरेचर’ (इंग्रजी विभाग), ‘कर्मवीर भाऊराव पाटील’ (मराठी विभाग) व ‘छत्रपती शिवाजी’(इतिहास विभाग) या संशोधन केंद्रांची स्थापना करण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत महाविद्यालयात इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व समाजशास्त्र या विषयातून पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठीची सोय करण्यात आली. सोबतच इंग्रजी, मराठी, इतिहास व भूगोल या विषयांसाठी एम.फिल मार्गदर्शन केंद्र तर पीएच. डी. च्या काही विषयांच्या मार्गदर्शनाची सोय करण्यात आली. सन १९४७ मध्ये १९ विद्यार्थी संख्येवर सुरु झालेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजची विद्यार्थी संख्या सन १९९६-९७ मध्ये ४४२२ पर्यंत जाऊन पोहचली. कॉलेजच्या स्थापनेपासून आजतागायत शैक्षणिकदृष्ट्या प्रगती केलेल्या या महाविद्यालयाच्या विद्यार्थी संख्येचा आलेख प्रतिवर्षी वाढताना दिसतो आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजने राखलेल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक दर्जामुळेच कॉलेजचे अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये आपले स्थान पटकावीत आहेत. शिवाय महाविद्यालयाच्या सर्वच विभागांचा दरवर्षीचा निकाल हा महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीची साक्ष देणारा असतो. महाविद्यालयाचे विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर साहित्य, कला, क्रीडा, वक्तृत्व, सांस्कृतिक, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आदी क्षेत्रामध्येही स्वत:च्या नावाबरोबर महाविद्यालयाची वेगळी ओळख निर्माण करत आहेत, हे महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत गौरवास्पद आहे. अध्ययन, अध्यापन, संशोधन व विस्तारकार्य या सर्व गोष्टींची दाखल घेऊनच ‘राष्ट्रीय मुल्यांकन आणि अधिस्वीकृती समिती, बेंगलोर (नॅक) यांच्याकडून मार्च २०११ मध्ये महाविद्यालयास ‘A’ ग्रेड तर सन २०१७ मध्ये ‘A+’ ग्रेड बहाल करण्यात आली. याशिवाय विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचेकडून महाविद्यालयास ‘College with potential for Excellence’ हा दर्जा दिलेला होता. छत्रपती शिवाजी कॉलेजने गेली अनेक वर्षे शिवाजी विद्यापीठाचे ‘अग्रणी महाविद्यालय’ म्हणून समर्थपणे नेतृत्व केले आहे. सन २०१८ पासून विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयास ‘स्वायत्त महाविद्यालय’ म्हणून दर्जा बहाल केलेला आहे. तर सन २०२१ साली महाविद्यालयास ISO 9001:2015 मानांकन प्राप्त झालेले आहे. महाविद्यालयाचा सर्वोच्च सन्मान म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विद्यापीठाचे जे स्वप्न पाहिले होते त्याची प्रत्याक्षानुभूती छत्रपती शिवाजी कॉलेज सोबतच यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि धनंजयराव गाडगीळ कॉलज ऑफ कॉमर्स या तिन्ही महाविद्यालयास मिळून ‘कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ’ म्हणून मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. म्हणून उपरोक्त दैदिप्यमान कामगिरी करणारे छत्रपती शिवाजी कॉलेज हे महाराष्ट्रातील केवळ कला शाखा असलेल्या महाविद्यालयांपैकी एकमेवाद्वितीय असेच आहे.
छत्रपती शिवाजी कॉलेजच्या भौतिक प्रगतीचा विचार करता या अमृतमहोत्सवी वाटचालीपर्यंतच्या प्रवासात अनेक मैलाचे दगड दिसून येतात. जून १९३९ मध्ये श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा कॅम्पमधील फलटण निवाससह १० एकर ८ गुंठे जमीन कर्मवीर अण्णांना दिली. ज्याठिकाणी १९४० मध्ये ‘महाराजा सयाजीराव फ्री अॅण्ड रेसीडेन्सीअल विद्यालय सुरु करण्यात आले, जे पुढे स्थलांतरित करून त्याठिकाणी नागझरीचे डी. पी. भोसले यांच्याकडून प्राप्त २५,०००/- रुपये आर्थिक मदतीच्या सहाय्याने सन १९४७ मध्ये फलटण निवास इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी कॉलेज सुरु करण्यात आले. सन १९४८-४९ मध्ये चार लेक्चर हॉलचे बांधकाम पूर्ण झाले. सन १९५१-५२ मध्ये मुख्य इमारतीच्या तळघराच्या चार खोल्या (सध्या हॉल क्र.१६ ते १९) बांधून पूर्ण झाल्या. १९५६-५७ मध्ये मुख्य इमारतीच्या दोन प्रशस्त हॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले, ज्याचे उदघाटन यु.जी.सी.चे चेअरमन डॉ. सी. डी. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. १९६०-६१ साली लेडीज होस्टेलचा पहिला मजला पूर्ण झाला ज्याचे उदघाटन प्रो.सौ. सुमतीबाई पांडुरंग पाटील यांनी केले. जानेवारी १९६० मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते सायन्स विभागाच्या इमारतीच्या बांधकामाची सुरुवात झाली तर पुढे त्याच इमारतीच्या तळमजल्याचे उदघाटन तत्कालीन राष्ट्रपती मा. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते डिसें., १९६० मध्ये करण्यात आले. सन १९६१ मध्ये प्रेक्षागृहाचे (रंजन हॉल) बांधकाम मार्च १९६३ मध्ये पूर्ण झाले. १९६२-६३ मध्ये हॉबी वर्कशॉपची इमारत म्हणजेच सध्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बांधून पूर्ण झाले.१९६३-६४ मध्ये विद्यार्थी वसतिगृहाच्या ३६ खोल्यांचे बांधकाम करण्यात आले. याच दरम्यान न्यायाधीश मा. पी. बी. गजेंद्रगडकर यांच्या हस्ते कर्मवीरांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सन १९७०-७१ मध्ये स्टाफ क्वार्टर्सचे बांधकाम करण्यात आले व त्याच वर्षी महाविद्यालयाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसविण्यात आला. सन १९८६-८९ दरम्यान शिवाजी ग्रंथालयाच्या इमारतीचा तळमजला तर १९९०-९१ मध्ये वरचा मजला बांधून पूर्ण झाला. सध्या प्रशासकीय कार्यालय म्हणून वापरात असलेल्या नुतनीकरण केलेल्या इमारतीचे ९ मे १९९५ रोजी मा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सन १९९४ मध्ये मुलींच्या वसतिगृहाची १२ खोल्यांची इमारत पूर्ण करण्यात आली. तर पुढे २०१४-१५ मध्ये यु.जी.सी.कडून प्राप्त अनुदानातून मुलींसाठी नवीन वसतिगृहाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. आज महाविद्यालयाच्या परिसरात दिसणारी भव्य इमारत म्हणजेच रामशेठ ठाकूर भवन होय. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कमवा व शिका योजनेमधून आपले शिक्षण पूर्ण केलेले माजी विद्यार्थी मा.रामशेठ ठाकूर यांच्या कडून प्राप्त सुमारे आठ कोटी रुपये खर्चून त्या इमारतीचे बांधकाम सन २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले. या इमारतीचा उद्घाटन समारंभ रयत शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते डिसेंबर, २०२१ मध्ये करण्यात आला. आज महाविद्यालयाच्या प्रांगणात दिसणाऱ्या टोलेजंग इमारतींचे श्रेय खुद्द कर्मवीर भाऊराव पाटील, कॉलेजचे थोर देणगीदार श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर, डी. पी. भोसले, सध्या महाविद्यालायचे तारणहार असलेले व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. रामशेठ ठाकूर, संस्थेचे विविध पदाधिकारी, सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांना द्यावे लागेल.
छत्रपती शिवाजी कॉलेजच्या यशस्वी वाटचालीमध्ये कॉलेजमधील ‘कमवा व शिका योजना विभाग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांचे योगदान विशेष उल्लेखनीय असेच राहिलेले आहे. किंबहुना या दोन विभागांमुळे कॉलेजची ओळख अधिकच अधोरेखित होते. श्रमप्रतिष्ठा जोपासत कॉलेजच्या ‘कमवा व शिका योजनेमधून कर्मवीर अण्णांच्या मूल्यांची व विचारांची आणि ज्ञानाची शिदोरी घेऊन आपल्या जीवनाचा प्रवास करणारे अनेक विद्यार्थी महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, प्रशासकीय, उद्योजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात आपापली अनोखी ओळख निर्माण करून करून आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापासून सुरु झालेला कमवा व शिका योजनेचा प्रवास आज संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये पोहचला आहे. त्याव्दारे समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित अशा बहुजनांची मुले शिक्षण घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवू पाहत आहेत. आजही छ.शिवाजी कॉलेजमध्ये दरवर्षी ग्रामीण भागातून आलेली सुमारे १०० पेक्षा अधिकचे विद्यार्थी या योजनेमध्ये प्रवेशित असून महाविद्यालयची शेती, पशुधनाचे संगोपन, ग्रंथालय विभाग, वसतिगृह व आवश्यक तेथे कार्यालयामध्ये काम करत श्रमप्रतिष्ठा जोपासत स्वावलंबी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. तर कॉलेजमधील ‘प्राचार्या सुमतीबाई पाटील व बॅरि. पी. जी. पाटील स्पर्धा परीक्षा केंद्र’ येथून मार्गदर्शन घेतलेले सुमारे ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत शासनाच्या विविध विभागामध्ये काम करत असताना रयतची मुल्ये, सचोटी व प्रामाणिकपणा याचे नवे आदर्श घालून देत आहेत.
शिक्षण हे अधिकाधिक समाजाभिमुख व्हावे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्हावा या प्रमुख उद्देशाने महाविद्यालयात सन १९६० पासून ‘राष्ट्रीय छात्र सेना (NCC) तर १९६९ पासून ‘राष्ट्रीय सेवा योजना (NSS)विभाग सुरु करण्यात आलेले आहेत. या दोन्ही विभागांच्या वतीने वर्षभर महाविदयालय दत्तक ग्राम योजनेअंतर्गत निवासी शिबीर, परिसराचे शुशोभीकरण, प्रबोधनात्मक कार्यक्रम, जनजागृती अभियान, वृक्षारोपण, पाणी-उर्जा-बेटी बचाव अभियान, रक्तदान शिबीर यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्वांची दखल घेऊनच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा ‘राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट महाविद्यालय’ हा पुरस्कार सन २००५-०६ मध्ये शिवाजी कॉलेजला प्रदान करण्यात आला. कॉलेजमधील ग्रंथालय विभागही अत्यंत समृद्ध असाच आहे. संशोधकांच्या दृष्टीने ते अनेक दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते व संदर्भ साधनांचे शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महत्वाचे केंद्र बनू पाहत आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासबरोबरच शारीरिक विकासही साधला जावा, त्यांच्यात खिलाडू वृत्ती निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालयातील क्रीडा विभाग (जिमखाना विभाग) सदैव तत्पर असतो. कॉलेजच्या याच विभागातून प्रशिक्षण घेतलेले महाराष्ट्र केसरी संजय पाटील, उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सूळ, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते विद्यार्थी काजल शानभाग (बास्केटबॉल), माया पवार (मल्लखांब), आदित्य अहिरे (मल्लखांब), स्नेहल कदम (स्विमिंग), उज्वला माने (वेटलिफ्टिंग) आदी विद्यार्थ्यांनी जिमखाना विभागाची उंची अधिकची वाढविली आहे. सन १९६९-७० पासून महाविद्यालयात कार्यरत असलेल्या सांस्कृतिक विभागाने लोकनृत्य, मूकनाट्य, सुगम गायन, पथनाट्य, एकांकिका, वक्तृत्व इ. प्रकारात आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा आजतागायत कायम राखलेली आहे.
महाविद्यालयाच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी महाविद्यालयातील सर्वच विभाग, सपोर्ट सर्व्हिसेस व महाविद्यालयातील सर्वच समित्या यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करणायत येते. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील युवक कल्याण कक्षाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माहाविद्यालयीन शिक्षणाला संगणकीय शिक्षणाची जोड देऊन, त्यांच्या ज्ञानात भर घालून आजच्या नवतंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम केले जात आहे.तर विद्यार्थ्यांच्या अंगी जीवनावश्यक कौशल्ये प्रदान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शोर्ट टर्म कोर्सेस व कौशल्ये विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. तर सन २०१८-१९ पासून महाविद्यालयात बी.व्होक अंतर्गत चालविल्या जात ‘मिडिया अॅण्ड इंटरटेनमेंट’ या पदवी कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पारंपारिक शिक्षण न देता कौशल्याधारित शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या जीवनात सक्षमपणे उभे करण्यचा हा स्तुत्य उपक्रम आहे.
आजपर्यंत संस्थेस लाभलेले दूरदृष्टीचे सर्वच अध्यक्ष, चेअरमन व सर्व पदाधिकारी यांनी निष्पक्षपातीपणे केलेल्या योग्य व सार्थ निवडीमुळेच महाविद्यालयास अत्यंत सक्षम व कार्यकुशल असे प्राचार्य लाभलेले आहेत.महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजअखेर अनुक्रमे प्राचार्य एन. जी. मोहिले (५ जून ते ३० नोव्हें.,१९४७), प्राचार्य जी. के. पाटील (१९४८-१९५१), प्राचार्य डॉ. ए. व्ही. मॅथ्यू (१९५१-१९५४), प्राचार्य एस. के. उनउने (१९५४-१९५७ व १९६४-१९७२), प्राचार्य बॅरि. पी. जी. पाटील (१९५७-१९६४ व १९७२-१९७५), प्राचार्या सौ. सुमतीबाई पांडुरंग पाटील (१९७५ ते १९७५ व १९७८ ते १९८५), प्राचार्य आर. डी. गायकवाड (१९७५ ते ७८ व १९८९ ते १९९५), प्राचार्य डॉ. एस. आर. सूर्यवंशी (१९८५ ते १९८९), प्राचार्य आर. के. शिंदे (०१/०७/१९९५ ते ३१/०७/१९९५), प्राचार्य एस. डी. भोर (मे ते जून १९९६), प्राचार्य मा. के. यादव (१०/०६/१९९६ ते ३१/०५/२०००), प्राचार्य डॉ. अरुण बर्गे (०९/०७/२००० ते ३१/०५/२००२), प्राचार्य किसनराव मोहिते (०१/०६/२००२ ते ३१/०५/२००७), प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे (०१/०६/२००७ ते २६/०५/२००८), प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव (२७/०५/२००८ ते २७/०१/२०१४), प्राचार्य डॉ. के. जी. कानडे (२८/०१/२०१४ ते ३०/०६/२०१४), प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर (०१/०७/२०१४ ते २१/०५/२०१७), प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे (२२/०५/२०१७ ते ०६/०७/२०२०), डॉ. विठ्ठल शिवणकर साहेब (०७/०७/२०२० ते १७/०८/२०२३) व विद्यमान प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे (१७/०८/२०२३ पासून आजअखेर) लाभलेले आहेत. उपरोक्त सर्व प्राचार्य व महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजअखेर महाविद्यालयात अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे सेवा व्यतीत करणारा सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद या सर्वांचेच महाविद्यालयाच्या सर्वंकष प्रगतीत विलक्षण योगदान राहिलेले आहे. ज्या-ज्या वेळी संपूर्ण समाजावर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती ओढावते त्यावेळी हा सर्व स्टाफ एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या परीने सर्वतोपरी सहकार्य करत असतो. अनेक दिग्गज व्यक्तींनी कॉलेजच्या विविध विभागामध्ये अध्यापनाचे काम करून त्या विभागांना नावारूपास आणण्याचे कार्य केलेले आहे.
थोडक्यात, छत्रपती शिवाजी कॉलेज हे रयत शिक्षण संस्थेचे पहिले कॉलेज आहे. त्याची स्थापना स्वातंत्र्यापूर्वी सन १५ जून १९४७ रोजी करण्यात आली. महान शैक्षणिक समाजसुधारक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी या कॉलेजची स्थापना केलेली आहे. या कॉलेजला खूप मोठा शैक्षणिक व सामाजिक वारसा लाभलेला आहे. या कॉलेजने अनेक जबाबदार पिढ्या घडविण्याचे कार्य केलेले आहे. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या अनेक व्यक्ती सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत मौलिक योगदान दिलेले आहे. महाविदयालय शैक्षणिक दृष्ट्या नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहेच मात्र ग्रामीण विद्यार्थ्यांप्रती नाळ जोडलेल्या, सामाजिक बांधिलकी जोपासलेल्या या महाविद्यालयाची अधिकाधिक प्रगती होणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने प्रत्येकाने आपला हातभार लावला पाहिले तरच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तळागाळातील, बहुजन, वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेला हा ज्ञानरूपी शैक्षणिक वारसा आपणास पुढील पिढीकडे हस्तांतरित करता येईल. धन्यवाद !