प्रिय असो अमुचा महाराष्ट्र महान………..
संपूर्ण देशभरात असलेली विविध राज्ये काही विशिष्ट गोष्टींसाठी परिचित असतीलही परंतु देशात महाराष्ट्र हे राज्य सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व इतर सर्वच बाबतीत एक अग्रगण्य राज्य म्हणून आजही आपली ओळख प्रस्थापित करून आहे. या राज्याच्या निर्मितीच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकल्यावर त्यातून स्वत:च्या अस्तित्वाची, अस्मितेची व नवनिर्मितीची स्फूर्ती मिळाल्याशिवाय राहत नाही असा तो दैदिप्यमान इतिहास आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, आदिवासी, क्रांतिकारक, समाजसुधारक, कवी व विचारवंत यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतल्याशिवाय स्वातंत्र्याचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. अशा सर्व घटकांच्या सहयोगातून कित्येक वर्षे ब्रिटिश सत्तेबरोबर केलेल्या अविरत संघर्षानंतर सन १९४७ मध्ये भारताला ब्रिटीशांच्या राजकीय गुलामगिरीतून मुक्तता मिळाली. प्रत्येक भारतीयांनी मनोमन इच्छिलेले स्वातंत्र्याचे भव्यदिव्य स्वप्न त्यांना प्रत्यक्षात अनुभवता आले. त्यामुळे भारताला प्राप्त झालेले स्वातंत्र्य हा जणू सुवर्णक्षण ठरला. या घटनेमुळे प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात नवनिर्मिती, आशा -आकांक्षा व चैतन्याचे वारे वाहू लागले. तथापि, स्वातंत्र्यपूर्व काळातच बीजे रोवले गेलेल्या भाषिक प्रांतरचनेने स्वातंत्र्यानंतर अल्पावधीतच आपले डोके वर काढले. विसाव्या शतकाच्या सहाव्या दशकात उद्भवलेल्या परिस्थितीचा सारासार विचार करता काहीसे नाइलाजास्तवच भारत सरकारला ऑक्टोबर १९५३ मध्ये आंध्र प्रदेश या पहिल्या भाषिक राज्याची निर्मिती करणे भाग पडले. त्यानंतर इतर राज्यातही भाषावार प्रांतरचनेच्या मागणीने जोर धरला. या प्रश्नाच्या निराकरणार्थ भारत सरकारने डिसेंबर १९५३ मध्ये फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली ‘भाषावार राज्य पुनर्रचना आयोगाची’ स्थापना केली. या समितीच्या शिफारशीनुसार १ नोव्हेंबर १९५६ रोजी देशात १४ राज्ये व सहा केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. याच पुनर्रचनेनुसार हैद्राबाद संस्थानातील पाच व मध्य प्रांतातील आठ मराठी भाषिक जिल्ह्यांसोबतच बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील तेरा जिल्ह्यांसह गुजरात यांच्या एकत्रिकरणातून द्वैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली. परिणामी एकभाषिक मराठी राज्याच्या अस्मितेसाठी इथला प्रत्येक घटक आपले तन-मन-धन अपर्ण करून इतर भाषिक राज्यांप्रमाणे मुंबईसह मराठी भाषिक लोकांचेही वेगळे राज्य असावे यासाठी सुरु झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत उत्सुर्तपणे सहभागी झाले. शेतकरी, कष्टकरी, कामगार, स्त्री-पुरुष, कवी-कलावंत, विचारवंत या प्रत्येकाने आपला सहभाग या चळवळीत नोंदविला. प्रदीर्घपणे आपल्याच देशबांधवांशी व आपल्याच सरकारशी केलेल्या संघर्षात महाराष्ट्रातील १०६ हुतात्मांच्या बलिदानानंतर १ मे, १९६० रोजी या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रीयन लोक मराठी ‘भाषिक तत्त्वाधारे’ स्वच्छंदपणे अन्याय, अत्याचार यापासून मुक्त झाले.
महाराष्ट्र राज्याला प्राचीन काळापासून असलेली पुरोगामित्वाची परंपरा इथल्या अनेक समाजसुधारकांनी, संतांनी, क्रांतीकारकांनी व विचारवंतानी अधिक समृद्ध केली. त्यामुळे इथला समाज अधिक प्रगल्भ व सजग आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाराष्ट्राला अनेक समाजसुधारकांचा, महनीय व्यक्तिंचा वैचारिक वारसा लाभल्यामुळे या प्रदेशात सामाजिक व धार्मिक क्षेत्रात घडवून आलेल्या क्रांतिकारी सुधारणा, या प्रदेशात झालेला औद्योगिक विकास, त्यामुळे समाजाची वृद्धिंगत झालेली आर्थिक स्थिती, राजकीय क्षेत्रात असलेले या प्रदेशाचे प्राबल्य व सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाचा झालेला प्रसार व त्यामुळे शिक्षित बनलेला समाज या सर्व कारणपरंपरांचा एकत्रित आविष्कार म्हणजे या प्रदेशातील व्यक्ती, समाज आपल्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात वेळीच सजग होऊन संघर्ष करण्यास सिद्ध होतो त्यामुळे अनेक सामाजिक चळवळींचे मूळ आपणास महाराष्ट्रात आढळते. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याचा, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचा, राजर्षी शाहू महाराजांनी समतेच्या प्रस्थापनेसाठी राबविलेल्या विविध धोरणांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रगल्भ वैचारिकतेचा व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ज्ञानप्रसाराचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी तर स्वातंत्र्योत्तर काळात एकभाषिक महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी, लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी भरीव योगदान दिलेले आहे याचा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात निश्चितच अभिमान आहे. महाराष्ट्राला लाभलेली नैसर्गिक व भौगोलिक पार्श्वभूमी, इथला सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व विवेकवादी वैभवशाली वारसा लक्षात घेता तो पुढील पिढीकडे हस्तांतरित करताना त्यामध्ये काही बाधा उत्पन्न होणार नाही याची आज प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेला आहे, त्याच महाराष्ट्रात आज त्यांचे विचार काहीसे मागे पडून काहीसी बावरलेली, सैरभैर स्थिती दिसते हे निश्चितच पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही.
महाराष्ट्र राज्याने निर्मितीपासूनच पुढील अर्धशतकात उद्योग, जलसिंचन, शेती, वाहतूक, दळणवळण, ऊर्जा संसाधने आदी सर्व क्षेत्रात नेत्रदीपक अशी प्रगती केली. शिवाय सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील आधुनिकतेच्या प्रगतीचा महाराष्ट्राचा आलेख सतत उंचावत ठेवला. त्यामुळेच आज महाराष्ट्र हे संपूर्ण देशात एक प्रगत, विकसित, पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. परंतु आजही महाराष्ट्र राज्यापुढे सीमावाद, प्रांतवाद, दुष्काळ, रोगराई, वाढती बेरोजगारी, दारिद्र्य, जातीयता, सांप्रदायिकता, नक्षलवाद, दहशतवाद, स्त्रियांची शोचनीय स्थिती, वाढती अंधश्रद्धा यासारख्या कित्येक समस्या या उग्ररूप धारण करून आहेत. त्यामुळे आज प्रत्येकाने कोणताही राजकीय, धार्मिक व जातीय पक्षपात यास थारा न देता सर्वांनी संघटीतपणे, समर्थपणे या संकटाशी दोन हात करण्यामध्येच आपल्या तमाम मराठी भाषिक महाराष्ट्रीयन लोकांचे सौख्य सामावले आहे. महाराष्ट्राचे वैभव जसे इथल्या डोंगर, दऱ्या-कडी कपारीत, उंचच-उंच वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यात आहे तसेच ते सर्वधर्म समभावात, सर्व जाती, धर्म, पंथ, जन्मठिकाण, लिंग या भेदापलीकडे जावून सर्वांनी एकोप्याने, गुण्यागोविंदाने, समतावादी परस्पर व्यवहार करण्यात आहे. असे झाले तरच संपूर्ण देशभरात महाराष्ट्राच्या राज्यगीतात वर्णन केल्याप्रमाणे जय जय गर्जा महाराष्ट्र माझा…..हा महाराष्ट्राचा शंखनाद सर्वत्र घुमत राहील यात तिळमात्र शंका नाही.
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !