Motivational

II गुरु साक्षात परब्रह्म II

mahadevchinde1 

एक कृतज्ञतापूर्वक प्रणाम आपल्या आदरणीय गुरुवर्यांना

भारतीय प्रथा आणि परंपरेनुसार प्रत्येक दिवसाला काही ना काही विशेष महत्त्व असते. त्याचप्रमाणे आज ०५  सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर ‘शिक्षक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे त्यानिमित्ताने…..

०५  सप्टेंबर हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा किंवा करू नये द्वंद्वात फारसे न जाता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा I गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमःII अर्थात गुरु म्हणजे ब्रह्म, गुरु म्हणजे विष्णू आणि गुरु म्हणजे महेश. याचाच साधा सरळ अर्थ असा होतो की गुरु हेच प्रत्येकाचे ब्रह्म म्हणजे निर्माते, विष्णू म्हणजे पालन-पोषण कर्ते तर महेश (शंकर) म्हणजे अंतकर्ते असा होतो. म्हणजे मानवाच्या जन्मापासून ते अंतापर्यंत प्रत्येक गोष्टीशी ज्यांचा घनिष्ठ संबंध आहे अशी प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये येणारी एक व्यक्ती म्हणजे गुरु किंवा त्याचा शिक्षक होय. गुरुविना कोणत्याही मनुष्याचे जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. आपल्या जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करण्यासाठी शिक्षकांची, गुरुची नितांत आवश्यकता असते. त्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन नेहमीच सदैव प्रेरणा देणारे ठरते. त्या दृष्टिकोनामधून व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्यांनी-ज्यांनी आपल्या आयुष्यात गुरुपदाला साजेशी कामगिरी करून व्यक्तीच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली, त्याचे संपूर्ण जीवन यशस्वी करण्यामध्ये जे योगदान दिलेले असते त्या योगदानाच्या स्मृती प्रित्यर्थ आपल्या आदरणीय गुरुवर्यांबद्दल एक प्रेमाची, कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. तसे पाहिले तर गुरूंच्या/शिक्षकांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ना गरज असते कोणत्याही निमित्ताची वा कोणत्याही दिवसाची. असे असले तरीदेखील आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात गुरफटून गेल्याने दररोज नसेना का पण किमान वर्षभरातून एक दिवस तरी त्यांच्यासाठी की, ज्या शिक्षकांनी/गुरूंनी आपणाला आपल्या आयुष्यामध्ये भरभरून दिलं त्यांच्या पायावर डोकं ठेवण्याचा, नतमस्तक होण्याचा हा एक कृतज्ञ दिवस आहे असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही.

आज ऐन तारुण्यात जीवन जगात असलेली पिढी ही गुरु-शिष्य परंपरेची महती गात जगलेली पिढी आहे. खरंतर आज समकालीन परिस्थितीचा विचार करता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की गुरु कोणाला म्हणावे ? असा प्रश्न काही जणांपुढे उभा राहतो. (कारण आज व्यक्ती सोडूनही अनेक मार्गाने आपण ज्ञान प्राप्त करू शकतो असे जरी आपणास वाटत असले तरीदेखील तो ज्ञानाचा बाह्य देखावा झाला.)  परंतु आपल्या आयुष्यामध्ये सर्वसाधारणपणे पुढील घटकांनी जे योगदान दिलेले आहे त्यामुळे आपण त्यांना निश्चितच गुरुस्थानी मानून काही ना काही प्रमाणामध्ये त्यांच्या ऋणामधून उतराई होण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू शकतो. प्रत्येक व्यक्ती आपापल्या विचारधारेप्रमाणे व मताप्रमाणे कोणासही तो गुरुपदाचा मान देऊ शकतो. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये साधारणतः पुढील प्रमाणे गुरु असतात,शिक्षक असतात याबद्दल दुमत असण्याचे कोणतेही कारण नाही.

आई वडील अर्थात माता पिता:

आई-वडील, माता-पिता हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील प्रथमस्थानी असणारे गुरु म्हणून त्यांना द्यावे तेवढी महत्त्व थोडेच आहे. कारण ज्यांच्यामुळे या जगताशी आपला परिचय झाला त्याचे सर्व श्रेय हे आपल्या मातापित्यांना द्यावे लागते. आपल्या बालबोध वयात ज्यांनी आपल्या हाताला धरून चालण्याचे, आयुष्यात पहिल्यांदा उभं राहण्याचे, बोलण्याचे जे धडे दिले मिळाले ते याच व्यक्तींच्याकडून. त्यामुळे इतर गुरूंच्यापेक्षा आपल्या मातापित्यांना नेहमीच सर्वश्रेष्ठ गुरुचे स्थान असल्याचे दिसते.

शिक्षक:

आपल्या आई-वडिलांच्या नंतर आपल्या आयुष्यात येणारा पुढील गुरु म्हणजे अर्थातच आपले शिक्षक असतात. कारण आई वडील हे आपले जन्मदाते असतात तर आपले शिक्षक हे आपले कर्मनिर्माते असतात. आपण आपल्याला लाभलेल्या शिक्षकांकडून अनेक बाबींचे अनुकरण करत असतो. म्हणजे बालपणी आपणास आपल्या आईवडिलांनी सांगितल्यानंतर जेवढे लक्षात राहणार नाही तेवढे आपण आपल्या शिक्षकांनी सांगितल्यानंतर लक्षात ठेवतो हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. त्यामुळे ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्याला न भरकटू देता योग्य वळणावरती आणण्यामध्ये, आपले जीवन सुखकर करण्यासाठी व आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखवण्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले ते शिक्षक हे प्रत्येकाचे गुरु असतात.

निसर्ग:

निसर्ग हा सुद्धा माणसाच्या आयुष्यातील एक सर्वात महत्त्वाचा गुरु किंवा शिक्षक म्हणून आपली भूमिका तितकीच यशस्वीपणे पार पाडत असतो. कारण शिक्षक आणि निसर्ग यांच्यामधील फरक जर आपणाला पहावयाचा असेल तर शिक्षक अगोदर शिकवतात आणि नंतर परीक्षा घेतात मात्र निसर्ग अगोदर परीक्षा घेतो आणि नंतर शिकवतो. त्यामुळे या निसर्गाकडून आपण बरेच काही शिकू शकतो. उदाहरणादाखल उल्लेख करायचा झाला तर छोट्या छोट्या पक्षांना उंचच उंच भरारी घ्यायला कोण शिकवतो? नुकत्याच जन्म झालेल्या माशाच्या छोट्याशा पिल्लांना कसं पोहायचं हे प्रशिक्षण कोणा दुसऱ्या ट्रेनरकडे लावण्याची काही आवश्यकता नसते तर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी शिकार कशी करायची हे वाघाच्या पिल्लाला कोणी सांगत नाही. तसेच एखाद्या बीजाला थोडसं पाणी मिळालं की त्यातून अंकुरायचं हे त्याची उपजत वृत्ती असते. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंदपणे वावरणारी  कोकिळा इतकं सुरेल गाणं कशी गाते या सर्व उदाहरणावरून आपणाला दिसून येईल की हे सर्व निसर्ग नियमाने घडत असते. कारण निसर्गासारखाच एक महान शिक्षक, गुरु त्यांना लाभलेला असतो त्यामुळे या ‘निसर्ग’ गुरुपेक्षा आणखी वेगळ्या गुरूकडे वेगळी शिकवणी लावण्याची आवश्यकता यापैकी कोणालाही भासत नाही.

आपल्या संपर्कातील प्रत्येक जण असतो आपल्या गुरु:

आपल्या आयुष्याच्या वाटचालीत आपले आई-वडील, शिक्षक, निसर्ग याचप्रमाणे आपल्या संपर्कातील प्रत्येक जण मग तो आपल्या  रक्ताच्या नात्याने असो अथवा नसो येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपला गुरु असतो. फक्त आपणास तो ओळखता आला पाहिजे. कारण आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाकडून आपण काही ना काही चांगल्या गोष्टींची शिकवण घेत असतो. अर्थात त्या व्यक्तीकडून काय घ्यायचे आणि काय सोडून द्यायचे हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून असते. जसे की भारतमातेचे रक्षण करणारा प्रत्येक शूरवीर जवान हा आपल्या संपर्कात असेलच असे नाही पण तो प्रत्येकजण आपणाला हेच शिकवितो की मोठ्या कष्टाने, खूप मोठी किंमत देऊन मिळविलेले  स्वातंत्र्य कसे टिकवायचे. या अर्थाने आपल्या संपर्कात आलेला प्रत्येक जण ज्ञात-अज्ञात हा आपला गुरु असतो हे मात्र निश्चित.

एकूणच काय तर गुरु म्हणजे नक्की काय याबद्दल विचार करत असताना असे म्हणावेसे वाटते की, गुरुविना कोण दावील वाट…तारावया आयुष्याचा हा अवघड घाट…. या उक्तीप्रमाणे ज्यांनी आपल्या आयुष्याला आकार दिला, योग्य मार्ग्दर्ष्ण केले, आपल्या स्थिरावलेल्या पावलांना जगण्याच बळ दिलं ते प्रत्येकजण आपले शिक्षक होते, गुरु होते. असे असले तरी गुरु म्हणजे नेहमीच सातत्याने मदत मागायची जागा नाही, तर गुरु म्हणजे अशी एक ताकद आहे, अशी एक श्रद्धा आहे की, आपल्या जीवन जगण्याला ती प्रेरणा देते. त्यामुळे उमेदीचं, चैतन्याचं, प्रेरणेचं एक झळकत रूप म्हणून आपण या गुरूंच्याकडे पाहू शकतो. ज्या गुरुंनी केवळ आपल्या पाठीवरती हात ठेवून लढ म्हटलं तरी आपल्या अंगामध्ये दहा हत्तीचं बळ संचारत आणि मनामध्ये चैतन्याचे, स्फूर्तीचे धुमारे फुटतात अशी व्यक्ती म्हणजे आपले शिक्षक व गुरु होय. अशा पद्धतीने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या जडणघडणीत ज्या ज्या व्यक्तींनी आपल्या गुरुस्थानी येऊन आपल्या आयुष्याला आकार दिला त्या प्रत्येक गुरूंच्या, शिक्षकांच्या पायावरती डोकं ठेवण्याचा हा एक कृतज्ञ दिवस आहे. याच न्यायने माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत माझे आई-वडील, शिक्षक, निसर्ग, संपर्कात आलेला प्रत्येकजण मग तो रक्ताच्या नात्यानं जोडलेला असो अथवा नसो अशा सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी, माझ्या आयुष्यरूपी जीवनाला आकर दिला,पाठबळ दिलं त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम ! व  सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

Recommended Posts

कर्मवीर भाऊराव पाटील
Social Reformers

द्रष्टे युगपुरुष, थोर शिक्षण भगीरथ: कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला विनम्र अभिवादन !

आधुनिक महाराष्ट्राला पुरोगामी वैचारिकतेची, क्रांतिकारी विचारांची, परिवर्तनवादी चळवळीची  गौरवशाली  परंपरा लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे त्यातील योगदान खूप मोठे आहे. शिक्षणाची द्वारे विशिष्ट वर्गापुरती बंधिस्त असताना रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून आपल्या कारकिर्दीमध्येच संस्था नावारूपाला […]

mahadevchinde1 
Motivational

II गुरु साक्षात परब्रह्म II

एक कृतज्ञतापूर्वक प्रणाम आपल्या आदरणीय गुरुवर्यांना भारतीय प्रथा आणि परंपरेनुसार प्रत्येक दिवसाला काही ना काही विशेष महत्त्व असते. त्याचप्रमाणे आज ०५  सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर ‘शिक्षक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे त्यानिमित्ताने….. ०५  सप्टेंबर हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा किंवा करू नये द्वंद्वात फारसे न जाता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा […]

mahadevchinde1 
Motivational

ऑगस्ट क्रांतिदिनी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आजी-माजी सैनिक सन्मान सोहळा संपन्न

शहिदांच्या रक्तानं भिजली इथली माती I त्याचा तिलक लावूया आज आपुल्या माथी II शौर्य आणि पराक्रमाची सांगे तिरंगा गाथा I माझ्या भारत भूचा सदैव उन्नत माथा  II                                             कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे घटक […]

mahadevchinde1